धांवोनि मी येतो परि – संत निळोबाराय अभंग – ५७६
धांवोनि मी येतो परि नेणें मारग ।
तूंचि लागवेग करीं आतां ॥१॥
अनाथ मी दीन रंक शरणांगत ।
म्हणूनियां त्वरित सांभाळावें ॥२॥
अहो दीनानाथा दीनबंधु देवा ।
मनींचा हा उगवावा हेत माझा ॥३॥
तुम्हां तों येविशीं न लगती सायास ।
प्रगटावया दिवस मास पळ ॥४॥
मी तों सर्वभावें आहे बुध्दिहीन ।
नेणें करुं ध्यान स्तवन पूजा ॥५॥
निळा म्हणे तुम्ही कृपेचे सागर ।
जाणता अंतर सर्वसाक्षी ॥६॥