अनाथाची कोण पाववील – संत निळोबाराय अभंग – ५४१
अनाथाची कोण पाववील हांक ।
तुम्ही तो नाइ्रक ब्रम्हांडाचे ॥१॥
मी एक दुर्बळ येतों काकुलती ।
नेणाची श्रीपती काय करुं ॥२॥
कोण तुम्हांपासी जाणवील मात ।
होऊनि कृपावंत मजवरी ॥३॥
तुम्हांसी तो धंदा बहुत बहुतांचा ।
तयामाजिं कैसा आठव माझा ॥४॥
जेथें थोर थोर संत मुनीश्वर ।
सनकादिक सुरवर भीड त्यांची ॥५॥
निळा म्हणे व्यर्थ गेलों वांयांविण ।
केला उरला शिण जन्मवरी ॥६॥