सूर्य प्रकाशाचा नेणेचि – संत निळोबाराय अभंग – ५३४
सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा ।
रात्रीचिया तमा न देखोनि ॥१॥
क्षीरसिंधु नेणे तृप्ती कैसी असे ।
क्षुधेचे वळसे इतरांसी ॥२॥
कल्पतरु नेणें औदार्य आपुलें ।
दैन्यचि देखिलें नाहीं तेणें ॥३॥
अमृता नाठवे अमत्व कैसेंही ।
मृत्यूचि त्या नाहीं म्हणोनियां ॥४॥
कामधेनु नेणें कामनेचा भोस ।
अपूर्णता तीस नातळतां ॥५॥
निळा म्हणे तैसा तुम्ही पांडुरंगा ।
नेणांचि वियोगा व्यापकपणें ॥६॥