आतां पुढे बाळचरित्र – संत निळोबाराय अभंग ५३

आतां पुढे बाळचरित्र – संत निळोबाराय अभंग ५३


आतां पुढे बाळचरित्र ।
कृष्णक्रिडा अति विचित्र ।
ऐकवां श्रवणी होती पवित्र ।
गातां वक्र शुचिभूंत ॥१॥
एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा ।
श्रवणीं पडतांचि अवचिता ।
कैवल्यपदप्राप्तीची योग्यता ।
पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥
श्रीकृष्णाची हे बाळलीळा ।
अदभूत सुखाचा सोहळा ।
वेधूनियां नरनारी बाळा ।
गाई आणि गावळा ब्रम्हप्राप्ती ॥३॥
ब्रम्हदिक दर्शना येती ।
सकळही देव आणि सुरपती ।
गगनी विमानें वाटती ।
सुमने वरुषति सुरवर ॥४॥
श्रीकृष्णाचें नामकरण ।
विधिविधानें व्दिजभोजन ।
नंदयशोदे उल्हास पूर्ण ।
सुवासिनी ब्राम्हण सर्व जना ॥५॥
मंगळघोषाचिया गजरीं ।
निशाणें दुमदुमलिया भेरी ।
टाळ मृदंग झणत्कारी ।
नाचती वैष्णव पदें गाती ॥६॥
निळा म्हणे नगरवासी ।
प्रांतवासी देशवासी ।
आले व्दिपांतरनिवासी ।
कृष्ण सोहभ पहावया ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां पुढे बाळचरित्र – संत निळोबाराय अभंग ५३