नारायणा तुमच्या चरणीं – संत निळोबाराय अभंग – ५१०
नारायणा तुमच्या चरणीं ।
भक्ति मुक्तिचिया खाणी ॥१॥
मोक्ष सर्वदा तिष्ठत ।
चरणीं जोडोनियां हस्तक ॥२॥
ऋध्दि सिध्दि वोळंगती ।
चरणीं तुमच्या श्रीपति ॥३॥
निळा म्हणे अवलोकितां ।
पाउलें सुकुमार सायुज्यता ॥४॥