ऐसा चिंतावोनियां मनीं – संत निळोबाराय अभंग ४९
ऐसा चिंतावोनियां मनीं ।
म्हणे निमाली पूतना भगिनी ।
माझिया राज्या आली हानी ।
म्हणोनि माभळभट पाठविला ॥१॥
तंव पिढेदान त्या प्राप्त झालें ।
नवलचि हें अपूर्व ऐकिलें ।
येऊनि आम्हातें जाणविले ।
नव्हें बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥
मग म्हणे वो रिठासुरा ।
जाऊनि तुम्ही बाळकासी मारा ।
देईन अर्धराज्य भारा ।
कार्यसिध्दि झालिया ॥३॥
मग रिठासुर तो मायावी ।
गुंफिली रिठेमाळ अति बरवी ।
करी घेऊनियां सादावी ।
नंदचौबारा जाऊनि ॥४॥
म्हणे हे बाळका लेववितां ।
सर्वकाळ कंठी असतां ।
कोण्याहि भयाची तया वार्ता ।
स्पशोंचे नेणे सामर्थ्यगुणें ॥५॥
कदापिही नव्हे भूतबाध ।
दिठीचें भय नाहीं त्या कदा ।
ऐसें ऐकोनियां यशोदा ।
आवडी घाली हरिकंठी ॥६॥
निळा म्हणे पालखीं बाळ ।
निजऊनियां यशोदा वेल्हाळ ।
मेळऊनियां स्त्रिया सकळ ।
हास्यविनोदें बैसली ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.