अचळ धरा तैसें – संत निळोबाराय अभंग – ३७२

अचळ धरा तैसें – संत निळोबाराय अभंग – ३७२


अचळ धरा तैसें पीठ ।
पायातळीं मिरवे वीट ॥१॥
दोन्हीं पाउलें समान ।
जैसे योगीयाचे नयन ॥२॥
जानु जंघ ते स्वयंभ ।
जैसे कर्दळीचे स्तंभ ॥३॥
कसीयलें पीतवसन ।
झळके विधुल्लते समान ॥४॥
शेष बैसला वेटाळां ।
तैसा कटिबंध मेखळा ॥५॥
समुद्र खोलीये विशाळ ।
तैसें नाभीचें मंडळ ॥६॥
तुळसी मंजरिया गळां ।
जैशा सुटल्या मेघमाळा ॥७॥
दिग्गजाचे शुंडादंड ।
तैसे कटीं कर प्रचंड ॥८॥
पूर्णिमेचा उदो केला ।
तैसा मुखचंद्र शोभला ॥९॥
जैसीं नक्षत्रें झमकतीं ।
तैसी कुंडलें चमकतीं ॥१०॥
सूर्य मिरवे नभमंडळा ।
तैसा केशराचा टिळा ॥११॥
क्षीराब्धीचे चंचळ मीन ।
तैसें नेत्री अवलोकन ॥१२॥
जैसें मेरुचें शिखर ।
तैसा माथां मुगुट स्थिर ॥१३॥
इ्ंदु प्रकाशें वेढिला ।
तैसा क्षीरोदकें वेष्टिला ॥१४॥
तृप्तीलागीं चातकपक्षी ।
निळा तैसा ध्यान लक्षी ॥१५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अचळ धरा तैसें – संत निळोबाराय अभंग – ३७२