रुपीं गुंतलीं मानसें – संत निळोबाराय अभंग – ३०४

रुपीं गुंतलीं मानसें – संत निळोबाराय अभंग – ३०४


रुपीं गुंतलीं मानसें ।
ध्यानीं मुनिजनां ज्याचें पिसें ।
तेंचि हें सुंदर स्वरुप कैसें ।
धरिलें भक्त कैवारा ॥१॥
अंगी चंदनाची उटी ।
तुळशी माळाहार कंठी ।
बुका शोभला लल्लाटीं ।
रत्नें मुगुटीं झळकती ॥२॥
कर्णी कुंडलें सुढाळें ।
नेत्र उत्फुल्लीत जैसी कमळें ।
दंत हिरियचीं व्दिदळें ।
सोलींव तैसे झळकती ॥३॥
कंठी कौस्तुभ आणि पदकें ।
श्रीवत्सलांछन ह्रदयीं निकें ।
एकावळी त्यावरी झळके ।
मुक्तमोतियें वाटोळीं ॥४॥
हात ठेंवुनी कटावरी ।
कांसे पितांबराची परी ।
नाना ठसे उमटले वरी ।
मेखळा रत्नें बरवंटा ॥५॥
चरण सकुमार साजिरे ।
पाउलें अत्यंत गोजिरें ।
वाकी घुंगरु झणत्कारें ।
करिती चेइरें आनंदा ॥६॥
संतसमुदाये देवढें ।
गर्जतीं गुणनाम पवाडे ।
वैष्णव नाचतीं बागडे ।
ब्रम्हानंद पीकला ॥७॥
राही रुक्मिणी सत्यभामा ।
परिवारवेष्टित पुरुषोत्तमा ।
अगाध पंढरीये हा महिमा ।
देव विमानीं दाटलें ॥८॥
निळा म्हणे पुरला हेत ।
ठेविलें पायांपाशीं चित्त ।
सांठवुनियां हदयांत ।
रुप पावलों विश्रांती ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रुपीं गुंतलीं मानसें – संत निळोबाराय अभंग – ३०४