वसुदेव देवकीचिये उदरी – संत निळोबाराय अभंग ३०
वसुदेव देवकीचिये उदरी ।
कृष्ण जन्मले मथुरेभितरीं ।
कंसाचिये बंदिशाळे माझारी ।
श्रावण कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥
अयोनिसंभव चतुर्भज ।
शंक चक्र गदांबुज ।
चहूं करी आयुधें सुतेज ।
मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥
कासे पींतांबर कसिला ।
कंठी कौस्तुभ तेजागळा ।
श्रीवत्सलांछन शोभला ।
माजी मेखळा जडिताची ॥३॥
मस्तकी मुगुट रत्नखेवणी ।
रत्नमय कुंडलें उभय कर्णी ।
देखोनियां देवकी नयनीं ।
म्हणे या कैसोनि आच्छादूं ॥४॥
देखतां वसुदेवहि विस्मित ।
म्हणे बाळ नव्हे हा जगन्नाथ ।
सायुधें भूषणे घवघवित ।
तेज:पुंज निजात्मा ॥५॥
देवकी लागोनियां पायांशीं ।
म्हणे गोकुळां नेऊनि लपवा यासी ।
विदित झालिया रायासी ।
नेदी वांचो या बाळका ॥६॥
निळा म्हणे ऐसी चिंता ।
जाकळुनी ठेली तया उभयतां ।
हें देखोनियां श्रीकृष्णनाथा ।
कळों सरलें ह्रग्दत ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.