गोपाळ म्हणती कान्हया – संत निळोबाराय अभंग – २६७
गोपाळ म्हणती कान्हया आमुचीं उमाणीं ।
सांगसी तरि चरणीं ठेंवूं माथा ॥१॥
यावरीं श्रीहरि बोले मधुराक्षरीं ।
पुसा रे झडकरी विलंब नका ॥२॥
मीचि मज न देखें मी माझें नोळखें ।
कान्हो कोण्या मुखें सांगे आतां ॥३॥
तंव बोले गोविंदु ऐका रे सावधु बोधीं विराला बोधु म्हणोनियां ॥४॥
एक म्हणती गोपाळा ।
देखणा माझा डोळा ।
तरी न देखो मातें आंधळा कैसेनि झाला ॥५॥
तंव कृष्ण म्हणे दयोतक तूंची प्रकाशक ।
मृगजळ केंवीं अर्क देखेल सांगे ॥६॥
एक म्हणती गडी रसना रस निवडी ।
तरि कां ने घे गोडी आपुली आपण ॥७॥
निळा म्हणे कान्हया बोलें आमुच्या काजा ।
सिध्दी गेलें गुज पावलेती ॥८॥