पिंगा म्हणिजे पिलंगोनि भिरभिरियाचे परी ।
फिराविसी माज मान तरि तुझी थोरी ॥१॥
चित्त हरिवरी गे ठेवूनि दे भोंवरी ।
नाहींतरी सर परती येथूनि जाय दुरी ॥२॥
वाउगाचि ताठा गे नाहीं वळवटा ।
येथें नाहिं काम तुझें जाई आल्या वाटा ॥३॥
निळा म्हणे निजानंदे कांपवी शरीर ।
धरुनियां निज मनीं रुक्मिणीचा वर ॥४॥