खेळों पंडखडे गे – संत निळोबाराय अभंग – २४१
खेळों पंडखडे गे बैसोनि निवाडे ।
आधीं उचली एक मग दोनि घेंई पुढें ॥१॥
सावधान चालि गे नेमाचेचि झेलि ।
दोन तीन पांच सात सांडी येक उचली ॥२॥
नेदी लागो ढका दुसरियासि झोका ।
हळूचि घेंई उचलूनियां तरिच खेळ निका ॥३॥
निळा म्हणे हरि गे साक्ष निरंतरी ।
तोचि जाणे सर्व आहे तुज मजही माझारी ॥४॥