गोधनें घेउनी गोपाळ – संत निळोबाराय अभंग – २२०

गोधनें घेउनी गोपाळ – संत निळोबाराय अभंग – २२०


गोधनें घेउनी गोपाळ आले ।
छायेसी बैसले कळंबाचिये ॥१॥
आतां म्हणे मांडा खेळ ।
गोमटी हे वेळ सांपडली ॥२॥
तंव कृष्ण म्हणती आधीं जेवा ।
रुचेल बरवा खेळ मग ॥३॥
पोटांत भुक सुकलें मुख ।
कोण ते सुख खेळायाचें ॥४॥
कोणा कैसा पाहोंदया दिठी ।
यारे सोडा गांठी शिदोरियाच्या ॥५॥
सोडितां सिदोया दाविती अवघे ।
तंव एका ऐशी नव्हे एकापरी ॥६॥
अरुष एक ते बोलताती बोल ।
परी अर्थ सखोल विचारतां ॥७॥
आधीं माझा घास भरी ।
मग मी श्रीहरी घेईन तुझा ॥८॥
कान्हा म्हणे ऐका रे वोजा ।
आधीं तुम्ही माझा घांस भरा ॥९॥
गोपाळ म्हणती शेवट गोड ।
पुरवीं आधीं कोड आमुचा घेई ॥१०॥
घाटा घुगया कोरडया भाकरी ।
एकाची शिदोरी शिळीपाकी ॥११॥
कढण काला कालविलें ताक ।
एकाचा साजूक दहींभात ॥१२॥
एक ते म्हणती आमुचें अंगिकारीं ।
मुखीं घांस भरी टाकूं नको ॥१३॥
चांगले कोणाचें आणावें गोपाळा ।
आमुचा हा दुबळा संसार ॥१४॥
तंव कान्हा म्हणे आईका रे गडे ।
तुमचेंचि आवडे घाला मुखीं ॥१५॥
तुमचीये हातींचें भाजीदेठपान ।
तें आम्हां समान पंचामृता ॥१६॥
आणखी अर्पिती उपाधी जाणिवा ।
विकृती त्यांचिया भावा देखोनि मज ॥१७॥
सर्व भावें आम्हां हेंचि गोड लागे ।
दांभिका न लगे भेदकांचे ॥१८॥
मिटक्या देऊनियां स्वीकारी श्रीरंग ।
मग म्हणे विभाग घ्यावा रे माझा ॥१९॥
ब्रम्हरस वरि नामाचें सिंचन ।
सेवा रे सज्जन सखें माझे ॥२०॥
जेऊनियां धाले गोविंदा पंगती ।
उध्दार ते देती स्वानुभवें ॥२१॥
धन्य तो सोहळा आनंदाचा खेळ ।
निळा म्हणे गोपाळ सांगती ज्यां ॥२२॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोधनें घेउनी गोपाळ – संत निळोबाराय अभंग – २२०