सये आनंदाचा अवचिता – संत निळोबाराय अभंग – २०८
सये आनंदाचा अवचिता आला पुर ।
याचे मुरलीचर उठितांचि गजर ।
मी मज नाठवेचि कैचें घरदार ।
ठेलें तटस्थचि राहिलें शरीर वो ॥१॥
ऐसे मोहन नाटक येणें केलें ।
जीव चैतन्य वो हरुनि नेलें ।
एकलें एकवटचि करुनी ठेविलें ।
नाठवें सासुरें ना माहेर ऐसें झालें वो ॥२॥
याचा नवलाहो हाचि एक वाटे ।
जीवीं जीव नुरे आनंदचि भेटे ।
तेणें सुखानंदें संसारचि आटे ।
मी हें माझें तों न दिसेचि कोठें वो ॥३॥
मनीं मानसीहि नुरोनिया थार ।
हदयभुवनीं होय याचाचि प्रसार ।
बुध्दी चाकाटली राहे निरंतर ।
सुखीं सुखाचाचि होतसे आदर वो ॥४॥
होतें आपुलीये घरीं हो निश्चळ ।
कोठें पाहें गेलें याचा निज खेळ ।
तैंचि पासूनि वृत्ति झालीं वो वोढाळ ।
मनीं नाठवेचि लेंकरुं ना बाळ वो ॥५॥
एका एकीची पडियेला फासा ।
याचा नेणोनियां स्वभाव वो ऐसा ।
माझा मजचि हा नवलावो मानसा ।
निळा म्हणे होता संचिताचा ठसा वो ॥६॥