माझया मीपणचा करोनि फराळ ।
उरलें खावयासी बैसला सकळ ।
ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ ।
यासि न पुरेचि ग्रासितां माझा खेळ वो ॥१॥
आतां काय देऊं नसंता जवळी ।
संचितप्रारब्ध तें भक्षिले समुळीं ।
कर्माकर्माच्या घेतल्या कवळी ।
विषयवासना त्या ग्रासिल्या निमिषमेळिं वो ॥२॥
भक्षिलें संपत्ती विपत्तीचे भोग ।
कांही नुरविताचि कोणाचाही भाग ।
अवघे भक्षूनियां नुरवि हा माग ।
नामरुप तेंही नेदीचि उरों सोंग वो ॥३॥
ऐसा भक्षूनियां पूर्ण नव्हे कधी ।
अवघ्या भक्षूनियां संसारउपाधी ।
जीव भवाचिया नुरवूनियां आधीं ।
केले येका येकि निजरुप अनादि वो ॥४॥
आधीचि दुर्बळ मी नव्हति कांही जोडी ।
पूर्वीच भक्षूनियां गेला वो तातडी ।
आणूं कोठूनि वाढूं या परवडी ।
हा तो भुकाळुचि सदाचा बराडी वो ॥५॥
आतां तृप्तीलागीं दिसें एक शेवटीं ।
भावभक्ति याचे वोगरीन ताटीं ।
तेणेचि होईल हा क्षुघेचि संतुष्टी ।
ऐसें निळा म्हणे विचारिलें पोटीं वो ॥६॥