संत निळोबाराय अभंग

सकळा मंगळांचे धाम – संत निळोबाराय अभंग 2

सकळा मंगळांचे धाम – संत निळोबाराय अभंग 2


सकळा मंगळांचे धाम ।
ज्याचेनि विश्राम विश्रांती ॥१॥
तो हा पंढरीचा रावो ।
सकळां ठावो कल्याणा ॥२॥
ज्याचेनी सुखा सुखपण ।
ज्याचेनी त्रिभुवन रुपस ॥३॥
निळा म्हणे ज्याचेनि निगमा ।
आणिली गरिमा जाणिवेची ॥४॥


अर्थ १:- (ह.भ.प. देवेंद्र महाराज भांडे यांच्या शब्दात)

ज्याच्या (परमेश्वराच्या)नावाने मनाला शांतीची विश्रांती हवीशी वाटत असेल असे सर्व मंगळाचे धाम एकच आहे||१||
ती कोण असेल असे तुम्ही म्हणाल तर तो दुसरा तिसरा कोणी नसून पंढरीचा परमात्मा पांडुरंग आहे,की ज्याने आपले कल्याण होईल.हे सर्वांना माहिती आहे.||२||
तिन्ही लोकांमध्ये ज्याचे रूप सुंदर आहे त्याने सुखाची प्राप्ती होईल.||३||
संत निळोबाराय असे म्हणतात की त्या परमेश्वराच्या नामस्मरणाचा परिणाम असा आहे की त्याने मला खऱ्या सुखाची जाणीव करून दिली. ||४||


अर्थ २:- (ह.भ.प देविदास महाराज मिसाळ यांच्या शब्दात)

सर्व मंगलांचे माहेर(मंगल म्हणजे जसेकि-गंगा,हिमालय पर्वत,काशी इत्यादि)विश्रांती सुद्दा आरामासाठी म्हणजेच विश्रांतीसाठी जिथे जाते असा आमचा देव आहे जो पंढरपुरचा मालक आहे,आणि सर्वांच्या कल्याणाची मोक्षाची इच्छा इथेच पुर्ण होऊ शकते सुखाला सुद्धा ज्याच्यामुळे सुख मिळते आणि या त्रिभुवणाला सुद्धा त्यामुळेच रुप मिळते असा आमचा निर्गुन परमात्मा त्यानेच या जगाची निर्मीती केली असे निळोबाराय म्हणतात.


अर्थ ३:- (ह.भ.प संतोष महाराज यांच्या शब्दात)

सर्व प्रकाराच्या मंगलमयाचे स्थान, ठिकाण ,धाम आणि ज्याच्यापासून खऱ्या अर्थाने जीवाला विश्रांती लाभेल अशे ठिकाण, असा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग. संपूर्णपणे जीवाचे कल्याण ज्या ठिकाणी ज्याच्या मुळे होते आणि ज्याच्यामुळे सुखाला सुख पण आले संपूर्ण त्रिभुवन ज्या निर्गुण असलेल्या परमात्म्यापासून रुपास आले आणि निळोबाराय म्हणतात ज्याच्यामुळे वेदांना ज्ञानाचा मोठेपणा मिळाला तो सर्व या पंढरीच्या पांडुरंगा मुळेच.


अर्थ ४:- (ह.भ.प श्रीकृष्ण सुंदरराव उबाळे यांच्या शब्दात)

जगातील सर्व मांगल्याचे धाम, स्थान ज्यामुळे जीवाला खऱ्या अर्थाने विश्राम मिळतो, खऱ्या अर्थाने विश्रांती मिळते ते पवित्र धाम म्हणजे पंढरी आहे. तो पंढरीचा राजा म्हणजे कोणी सामान्य नाही तो सर्वांना कल्याण देणारा दाता आहे. ज्याच्यामुळे सुखाला सुखपनं मिळतं. खरं खरं सुख मिळतं. ज्याच्यामुळेच या त्रिभुवणाला रूप प्राप्त झालेले आहे. संपूर्ण त्रिभुवनच पंढरीच्या राजाचं रूप आहे. संत निळोबाराय म्हणतात, ज्याच्यामुळेच निगम म्हणजे वेद, शास्त्र, पुराणे आहेत. त्याच्यामुळेच सर्व जाणिवांना महत्व प्राप्त झालेले आहे तो पंढरीचा राजा आहे.


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सकळा मंगळांचे धाम – संत निळोबाराय अभंग २

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *