देतां आलिंगन नंदाच्या – संत निळोबाराय अभंग – १९४
देतां आलिंगन नंदाच्या कुमरा ।
पडेल उतार हे वांचेल सुंदरा ।
नका आड घालूं संदेह दुसरा ।
लावा उठवूनि जाऊं दया इतरां वो ॥१॥
ऐसे बोलती त्या जीवीच्या जिवलगा ।
झाला विरह गे वांचवा सुभगा ।
आणा पाचारुनी गे एकांता श्रीरंगा ।
दुजा उपावोचि नचले या प्रसंगा वो ॥२॥
आहे ठाउकें हें अंतरी आम्हांसी ।
याचा वेध झाल्या दशाचि हे ऐसी ।
होते आटणी गे जिवा आणि शिवासी ।
तेथें देहबुध्दी नाठवे देहासी वो ॥३॥
हदयी होतांचि या कामाचा संचार ।
न्यावा एकांतासि निष्काम यदुवीर ।
देईल सुख तोचि नाहीं ज्यासि पार ।
सांडा चावटी आणिक विचार वो ॥४॥
नाहीं अनुभव हा ठाउका जयासी ।
त्याचि भोगिती या अनुदिनीं दु:खासी ।
येती जाति पुन्हा होति कासाविसी ।
आम्ही न विसंबो या सावळया कृष्णासी वो ॥५॥
नाही जीवीं या जीविताचि चाड ।
याच्या संगसुखें घालूं वो धुमाड ।
स्वामी निळयाचा पुरवील कोड ।
आणा तोचि आतां सांडा बडबड वो ॥६॥