एकलें न कंठचे याविण मज – संत निळोबाराय अभंग – १९२
एकलें न कंठचे याविण मज आतां ।
घेवोनि विचरेन सवें प्राणनाथा ।
जनी वलीं वो एकांति वसतां ।
न करि वेगळा हो युगें कल्प जातां वो ॥१॥
हातीं लागला वो युगादिचा निध ।
भाग्यें माझिया वे जोडियला सिध्द ।
करुनि उपचार पूजिन सावध ।
न वंचीं शरीर सेविन एकविध वो ॥२॥
याचिये संगतीं वो सुखाचिया कोडीं ।
वेचतां युगें कल्प मज वाटे घडी ।
भोगीन नित्य नवा जीवाचे आवडी ।
भरुनि निज दृष्टी पाहेन घडी घडी वो ॥३॥
अवघे निवेदिन अंतरीचे भोग ।
यासि करुनियां सये अंगसंग ।
कांही न वंचिता मन बुध्दी अंग ।
भोगिन निजशेजें श्रीरंग वो ॥४॥
त्यागें जीवाचिया घालीन यासि मिठी ।
जातां युगसंख्या कल्पाचिया कोटी ।
धरिन अंतरीं वो बांधोनियां गांठीं ।
यावरी न करि मी कदा यासि तुटी वो ॥५॥
कळे अंतरीचा भाव या परेशा ।
होय प्रियवादें जैसा केला तैसा ।
पुरवीं निजदासीं केला जो धिवसा ।
निळा म्हणे आहे कृपावंत ऐसा वो ॥६॥