तुमच्या कीर्तनें पावलों पार – संत निळोबाराय अभंग १९

तुमच्या कीर्तनें पावलों पार – संत निळोबाराय अभंग १९


तुमच्या कीर्तनें पावलों पार ।
भवसिंधूचा लहान थोर ।
पशुपक्षी दैत्य निशाचर ।
नारीनर बाळकें ॥१॥
पुण्यपावन तुमची कथा ।
एकाक्षर श्रवणीं पडतां ।
झाडा करुनियां दोषां दुरितां ।
कलिमल तत्वता विध्वंसती ॥२॥
हरिनामाच्या घोष गजरी ।
ध्वनि रिघतांचि कर्णविवरी ।
भितरील पातकांचिया हारी ।
दिशा लंघोनि पळताती ॥३॥
आनंदासि उणेंचि नाहीं ।
कोंदोनि ठाके अंतर्बाही ।
नाना चरित्रांची नवाई ।
श्रोते ऐकोनि संतोषती ॥४॥
गिरी उचलिला गोवर्धन ।
निजमुखें प्रासिला हुताशन ।
काळिया आणिला नाथून ।
मिसें जाऊन चेंडूवाच्या ॥५॥
वत्सें गोवळे चतुराननें ।
नेतां अवघीं आपणचि होणें ।
स्तनीं लावितां पूतनाशोषणें ।
केलीं विंदानें अघटित ॥६॥
परता सारुनियां सागर ।
माजी रचिलें व्दारकापूर ।
निद्रा न मोडितां नारीनर ।
मथुरा नेऊन सांठविली ॥७॥
काळयवनासि ठकिलें कैसें ।
मुचकुंदावरी नेला पळत्या मिसें ।
जाळूनि त्याचे केलें कोळसें ।
आपण निराळा साक्षपणें ॥८॥
भाजीदेठें तृप्त होणें ।
पांडवा नेणतां ऋषिभोजनें ।
परीक्षितीसी गर्भीचि रक्षणें ।
अपूर्व विंदाने श्रीहरीचीं ॥९॥
यशोदेचें स्तनपान करीत ।
नंदा कडिये विराज तेथ ।
गोपिकांचे मनोरथ ।
पूर्ण करित रासक्रीडे ॥१०॥
गौळणी रंजवी नानापरी ।
दही दूध लोणी त्यांचे चोरी ।
उणें पडतां त्यांचिये घरीं ।
अधिकचि करीं वाढूनियां ॥११॥
गायींमागें धांवे रानीं ।
घोंगडें काठी पावा घेउनी ।
नानापरीचीं खेळे खेळणीं ।
लीलाविग्रही अवतारी ॥१२॥
ऐशीं अगाध दिव्य चरित्रें ।
गाती ऐकती त्यांची गात्रे ।
अवघीं होऊनियां पवित्रें ।
जाती वैकुंठा निळा म्हणे ॥१३॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुमच्या कीर्तनें पावलों पार – संत निळोबाराय अभंग १९