कृष्णरुपा वेधिल्या नारी – संत निळोबाराय अभंग – १८४
कृष्णरुपा वेधिल्या नारी ।
देखती अंतरी तेंचि रुप ॥१॥
गमनीं शयनीं आसनी भोजनीं ।
देखती जनीं वनीं दृष्टीपुढें ॥२॥
एकांती लोकांती घरीं दारीं बाहेरी ।
त्याविण निजाचारीं नेणती दुजें ॥३॥
निळा म्हणे सर्वहि त्याचा परिवार ।
होवोनी सारंगधर ठेला घरीं ॥४॥