एकी म्हणती हरि – संत निळोबाराय अभंग – १८१
एकी म्हणती हरि आमुचा सोयरा ।
दुजी म्हणे घरा पुसों जांई ॥१॥
तिजी म्हणे काली आणिला पोसणा ।
चौथी म्हणे कान्हा यशोदेचा कीं ॥२॥
एकी म्हणे माझा नोवरा साजणी ।
एकी म्हणे बहिणी पाठीची मी ॥३॥
निळा म्हणे म्हणती आमुचा पिता ।
एकी म्हणे चुलता सखा माझा ॥४॥