याच्या संगसुखें गर्भवास घेतां ।
येत जात गे कल्पाच्या चळथा ।
नेघो भुक्ति मुक्ति देतां सायुज्यता ।
ऐशा गौळणी त्या सुखानंदभरिता वो ॥१॥
धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रीरंगी ।
नेणती दुसरें वों संसारी विरागी ।
हरिचीं भूषणें त्या लेऊनि निजांगी ।
सुखी सुखरुप भोगी नित्य त्यागी वो ॥२॥
याच्या सहवासें वो भोगिता निजभोग ।
भोगीं भोगातीता सर्वदा नि:संग ।
नथेचि दृष्यावरी देखतीहि जग ।
ऐशा विचरती होऊनि अनंग वो ॥३॥
नित्य जनीं वनीं हरीतें देखती ।
हरीचि होऊनियां हरीतें भजती ।
हरिरुप झाली त्यांची अंगकांति ।
हरिचि मुसावला ध्यानीं मनीं चित्तीं वो ॥४॥
येती जाती त्या हरिच्या सांगा तें ।
वसती नित्यकाळ हरि वसे जेथें ।
करिती भोजने त्यां जेववितां हरीतें ।
हरीविण त्या न घेती जीवनातें वो ॥५॥
निळा म्हणे तया हरीच सांगाती ।
त्याहि वर्तताती हरीच्या अनुवृत्ती ।
नाहीं उरविली दोनीपणें खंती ।
वसती एकएकीं निजात्मता युक्ती वो ॥६॥