कांहींच नहोनियां कांहीं – संत निळोबाराय अभंग – १७०

कांहींच नहोनियां कांहीं – संत निळोबाराय अभंग – १७०


कांहींच नहोनियां कांहीं एक होता ।
नामारुपातीत आपण नेणता ।
होण्यानहोण्याच्या नेणोनियां वार्ता ।
त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो ॥१॥
ऐशा परि हा मूर्तिमंत झाला ।
विश्वीं विश्वकार होऊनियां ठेला ।
भाग्यें आमुचिया मूर्ती मुसावला ।
गाऊ वानूं ऐसा आम्हांसी फावला वो ॥२॥
नव्हे ते पुरुष ना नारीपण जेथें ।
शुन्या निरशून्याहि पैलाडी परते ।
नाकळे नाद बिंदू कळा ना ज्योतितें ।
परा पश्यंतीचा प्रवेश नाहीं जेथें वो ॥३॥
गुणलावण्याची उघडली खाणी ।
मंडित चतुर्भुज मुगुट माळा मणी ।
मुख मनोहर कुंडलें श्रवणीं ।
श्रीवत्सलांछन ह्रदयीं साजणी वो ॥४॥
घ्या गे उचलूनि जाऊं निजघरा ।
आजि फावला तो पाहों यदुवीरा ।
खेळों आदरें या खेळवूं सुंदरा ।
याच्यासंगे नाहीं सुखा पारावरा वो ॥५॥
निळा म्हणे ऐशा संवादे सुंदरी ।
करिती क्रिडा सवें घेऊनि मुरारी ।
सुखी सुखरुप झाल्या कल्पवरी ।
पुन्हा न येती त्या फिरोनि संसारीं वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कांहींच नहोनियां कांहीं – संत निळोबाराय अभंग – १७०