ब्रम्ह आणि गोवळपणें – संत निळोबाराय अभंग १७
ब्रम्ह आणि गोवळपणें ।
यज्ञ भोक्ता आणि उच्छिष्ट खाणें ।
महर्षिस्तव आणि हुंबरी घेणें ।
नाटकी विंदानें अघटित ॥१॥
नित्यमुक्त आणि बांधला गळा ।
परात्पर आणि कोंडिती बाळा ।
ब्रम्हचर्य आणि सहस्त्र सोळा ।
भोगिल्या अबळा आणिखीही ॥२॥
असुरमर्दन आणि मारिती गौळणी ।
लक्ष्मीकांत आणि चोरितो लोणी ।
ईशाचा ईश आणि फोडितो दुधाणीं ।
गुणातीत अगुणी भरलासे ३॥
विश्वव्यापक आणि यशोदे कडिये ।
शुकाचें ध्यान आणि दासी पिढिये ।
कृपावंत आणि मारिली माये ।
रडे ये माये ये माये लटिकाचि ॥४॥
रोमीं ब्रम्हांडे आणि बाळक झाला ।
आतुर्बळी आणि उखळी बांधिला ।
बळीचा व्दारपाळ आणि पंढरियें आला ।
पुसतांचि याला नाहीं कोणी॥५॥
सखा भावाचा आणि मामासीचि मारी ।
धर्मस्थापक आणि अकर्मे करी ।
देहातीत आणि आयुधें धरी ।
अकर्ता करी मना आलें ॥६॥
सर्वज्ञचि आणि नेणता झाला ।
काळाचाहि काळ आणि बाऊसि भ्याला ।
माउशीचे स्तनीं विषचि प्याला ।
उत्तीर्ण तिये झाला जीवघातें ॥७॥
अरुप आणि घेतलीं सोंगें ।
निष्काम आणि गौळणी मागें ।
नित्य तृप्त आणि गोवळसंगे ।
नित्य उच्छिष्टें खाय त्यांची ॥८॥
भूपति आणि मंत्री माकडें ।
अर्धांगी नोवरी आणि नेली म्हणून रडे ।
नावा सांडुनी तारितो दगडें ।
वनवासी उघडें फळें भक्षी ॥९॥
अमरां पूज्य आणि राखितो गाई ।
क्षिराब्धीचा जामात आणि घोंगडें डोई ।
ईशाचा ईश आणि लोळतो भुई ।
नंदाचे गोठणीं गाईवाडा ॥१०॥
सनकादिक देव स्तविती भावें ।
तो हा लंपट गौळणीसवें ।
न मागती त्यांसी देऊचि धांवे ।
आणि मागत्यासी व्हावें अतिकृपण ॥११॥
जगदानी आणि भिकारी झाला ।
विराटरुपी आणि खुजट ठेला ।
त्रिपाद देतां त्रैलोक्य नेला ।
शेखीं बळीनें बांधला व्दारदेशीं ॥१२॥
नित्य पूर्ण आणि भोजन मागे ।
बाळकाचि दात्याचें कांपवी अंगे ।
न जेवितां सवें पळोचि लागे ।
मग धांवे त्यामागें विमानीं घालीं ॥१३॥
दयावंत आणि अंगींच चिरलें ।
मयोरध्वजाचीं केलीं शकलें ।
उदार कर्णाचे दांतचि पाडिले ।
शिबीतें सोलिले कपोतासाठीं ॥१४॥
ब्राम्हणभक्त आपणा म्हणवी भला ।
आणि नारदाची नारदी करुनी ठेला ।
सख्ये बहिणीची भीड नाहीं याला ।
जांबळाच्या निमित्यें केला उपहास ॥१५॥
वेदांसी स्तवितां उगाचि बैसे ।
आणि गौळणीच्या शिव्या ऐकोनि हांसे ।
नित्यानंद आणि रडतचि बैसे ।
आळी घेउनी मिसे जेवणाच्या १६॥
निळा म्हणे हा लाघवी हरी ।
कांहींही न करुनी अवघेंचि करीं ।
भक्तां व्देषियां एकेचि परी ।
निंदा स्तुतीवरी सम देणें ॥१७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
ब्रम्ह आणि गोवळपणें – संत निळोबाराय अभंग १७