एकीं येकटेंचि असोनि – संत निळोबाराय अभंग – १६८
एकीं येकटेंचि असोनि एकला ।
विश्वीं विश्वाकार होऊनियां ठेला ।
जया परीवो तैसाचि गमला ।
नंदनंदन हा आचोल अंबुला वो ॥१॥
ऐशा गौळणी त्या बोलति परस्परीं ।
करुनि विस्मय आपुलाल्या अंतरीं ।
विश्वलाघवीया हाचि चराचरीं ।
नेणों महिमा यांसी म्हणों व्यभिचारी वो ॥२॥
गिरी गोवर्धन येणें उचलिला ।
काळिया महासर्प नाथुनि आणिला ।
जळत वणवा वो मुखेंचि प्राशीला ।
गिळितां आघासुर चिरुनी सांडिला वो ॥३॥
कपटया माभळभटा दिल्हें पिडेदान ।
शोषिली पूतना विषें पिाजितांचि स्तन ।
उखळीं बांधता उपटिले विमळार्जून ।
भक्षूनि मृतिका वदनीं दाविलीं भुवनें वो ॥४॥
आणिखीं एक येणें नवलावो केला ।
काला वांटितां वो विधाता ठकिला ॥
भाग नेदितां तो वत्सें गोवळ घेऊनि गेला ।
तैसिच आपण येथें होऊनियां ठेला वो ॥५॥
इंद्र चंद्र महेंद्र यातेचि पूजीती ।
श्रुति शास्त्रें तेही यातेंचि स्तविती ।
महासिध्द मुनि ध्यानीं आराधीती ।
निळा म्हणे तो हा जोडला सांगाती वो॥६॥