अग्निसंस्कार देउनी त्यासी ।
संपादिलें उत्तर विधीसी ।
मग निजगजरें उग्रसेनासी ।
स्थापिलें राज्य सिंहासनीं ॥१॥
नवाचि ध्वज नवें छत्र ।
व्दाहीं फिरविली सर्वत्र ।
साखरा वांटूनियां नगरांत ।
केले दानपात्र परमसुखी ॥२॥
रायाचे पूर्वील जे प्रधान ।
सन्मानिले ते गौरऊन ।
प्रजेसी सिरपाव देऊन ।
अधिकारी जन सुखी केले ॥३॥
यावरी मातापिता बंदिखानीं होतीं त्या बाहेरी काढुनी ।
वादयें लावूनी मंगलस्नानीं ।
बरव्या प्रकारीं पूजिलीं ॥४॥
वस्त्रे अलंकारें गौरविलीं ।
निजमंदिरातें अणियेलीं ।
सिबिका यानीं बैसविलीं ।
घोषगजरें मिरवित ॥५॥
तये काळींचा तो आनंद ।
सांगावया मी मतिमंद ।
जेथें परमात्मा गोविंद ।
संतोषवित मातांपिता ॥६॥
निळा म्हणे बोबडया बोली ।
हरिची कीर्ति हे वाखाणिली ।
संती पाहिजे उपसाहिली ।
नेणतें लडिवाळ म्हणोनियां ॥७॥