सभें कंस सिंहासनीं ।
बैसल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं ।
गेले चकपक अंगीचे निघोनी ।
संचारला मनीं श्रीकृष्णा ॥१॥
राव भयाचिये भक्ती ।
कृष्णाचि देखे सकळां भूतीं ।
आपआपणसीही अंतीं ।
कृष्णरुपेंचि देखतु ॥२॥
जें जें देखे चाखे ऐके ।
तें तें कृष्णाचिया रुपें एके ।
ऐसा वेधोनियां निष्ठकें ।
ठेला निजसुखें निजकृष्णीं ॥३॥
सैन्य संपदा घरें दारें ।
स्त्रिया आदि करुनियां लेकुंरे ।
कृष्णवांचूनियां दुसरें ।
नाढळेचि जागृती निद्रे स्वप्रांत ॥४॥
कृष्णदेव आले जवळीं ।
हेंही नेणे तो ते काळीं ।
कृष्णावलोकनीं हें नव्हाळीं ।
लाधली भये आणि व्देषें ॥५॥
कृष्णचि त्या आसनीं शयनीं ।
कृष्ण भोजनी त्या प्राशनीं ।
कृष्णासी देखे जनीं वनीं ।
घेतला वेष्टुनी कृष्णरुपें ॥६॥
कृष्णावांचुनी नुरेचि कांहिं ।
जिवी मनीं बुध्दी देहीं ।
कृष्णचि होऊनियां लवलाही ।
कृष्णामाजीं मिसळला ॥७॥
कृष्णीमाजीं मिसळला ॥७ कृष्णीं कृष्ण तदाकार ।
होऊनियां राजा कंसासुर ।
पावला विश्रांतीचें घर ।
योगी साचार न लाहती जें ॥८॥
निळा म्हणे निजात्मत्योती ।
कंसाह्रदयीं जे बहु काळ होती ।
ते कृष्णें शोषूनियां निगुती ।
ठेविला आपुलिया निजह्रदयीं ॥९॥