कृष्णबळिरामातें म्हणती – संत निळोबाराय अभंग – १६१
कृष्णबळिरामातें म्हणती ।
गोवळे तुम्हीं अर्भक जाती ।
मारिला म्हणोनी कुळवई हस्तीं ।
तेणेंचि स्फुंदेस्फुंदूं नका ॥१॥
बहुत दिवस खादलें लोंणी ।
चोरिये वोसिली दुधाणी ।
सिंतरुनियां भोगिल्या गौळणी ।
त्याचीही झाडती निघेल ॥२॥
न विचारित पतंग जैसा ।
झडपूं धांवें दीपप्रकाशा ।
तैसे तुम्ही नेणंता कंसा ।
राया सन्निध पावलेती ॥३॥
पिपालिके फुटतां पक्ष ।
म्हणे गगन लंघीन मी अंतरिक्ष ।
परी मृत्यु पातला हें प्रत्यक्ष ।
न लक्षेचि परी ते झाली तुम्हां ॥४॥
रज क मर्दूनियां बलौता ।
निदसुरियां धनुर्धरा समस्तां ।
यश मानियेलें परि तें आतां ।
येचि क्षणीं जाणवेल ॥५॥
पूतना बाई माभळ भट ।
एक ते स्त्री एक ते भट ।
कागबगादिदैत्य आदट ।
नेणती मल्लसंग्राम ॥६॥
निळा म्हणे ठाकिलें त्यांसी ।
तेचि पाहों येथ आलेसी ।
ऐसे बोलोनियां अति आवेशी ।
भुजा थापटोनी उठिले ॥७॥