तंव कृष्ण म्हणे बळिरामदेवा ।
आमुचाही वांटा कांही ठेवा ।
ते म्हणती यावरी अवघा ।
तुमचाचि भाग निश्रिचतार्थे ॥१॥
कुळवई आणि राजा कंस ।
अर्थार्थी हे दिधले तुम्हास ।
कृष्णजी म्हणती हें नये चित्तास ।
यांतहि वाटा पाहिजे ॥२॥
बरें म्हणोनियां बळिराम ।
यांतहि घ्या हो निमेनिम ।
मग मिसळले जेंवि निरसावया तम ।
चंद्रसूर्य पौर्णिमेचे ॥३॥
तेथें झाला हाहा:कार ।
घ्या घ्या शब्द उठिला थोर ।
कृष्ण नेटका झुंजार ।
आणि बळिरामहि महाबळी ॥४॥
करुनियां मल्लां महामारी ।
निर्दाळिले एका निमिषावरी ।
तंव तो कुळवई लोटिला निशाचरीं ।
कृष्णें सोंडेसीचि धरियला ॥५॥
आसडूनियां तो महीवरी ।
उपटूनि दांत घेतले करीं ।
ठोकिता तेणेंचि मस्तकावरी ।
ठिकरिया केली गंडस्थळें ॥६॥
निळा म्हणे बळियाबळि ।
माजी ब्रम्हांडा एक वनमाळी ।
यापरी करुनियां रवंदळी ।
निर्दाळिले असुर ॥७॥