राया जाणविती सेवक ।
अक्रूरें आणिला नंदबाळक ।
तेणं मर्दुनी बळिया रजक ।
धनुर्यागही भंगिला ॥१॥
आतां येऊनियां चौबारी ।
उभा रंगशिळेवरी ।
अवघ्या पाहाती नगरनारी ।
लोकपरिवारीं मिळोली ॥२॥
उभयतां बंधू अति सुंदर ।
बळिराम आणि सारंगधर ।
आणखिही गौळियांचे कुमर ।
सवंगडे भार पांच शतें ॥३॥
कृष्ण लावण्य रुपाकृती ।
चंद्रसूर्या दवडी परती ।
अनंग तोहि उषभूपती ।
ऐसें सौदर्य हरिअंगी ॥४॥
लोक मिळाले भोंवते ।
पाहातां धणी नपुरे त्यातें ।
जाऊंचि विसरले मागुते ।
शोधलें चित्तें हरिरुपा ॥५॥
आणिक एक वितलें राया ।
कुब्जे चंदने चर्चिल तया ।
करुनियां ते दिव्य काया ।
ठेविली कृष्णें क्षणार्धे ॥६॥
निळा म्हणे सांगता ऐसें ।
चकित रावो निज मानसे ।
देहीं देहातें नुमसे ।
चित्रींचे लेप तयापरी ॥७॥