रेखिले निढळीं केशरीं टिळक ।
तयावरी कस्तुरी परम सुरेख ।
उत्तम कुंकूं जाउळीं देख ।
लाविलिया आरक्त अक्षता ॥१॥
मग तो चंदन मलयागर ।
चर्चिला सुवासित अति परिकर ।
यावरी काढुनी सुमनाहार ।
उभयतां कंठीं ओपिले ॥२॥
तुरे खोविले मस्तकावरी ।
तेणें शोभले बळरामहरी ।
मग ठेवूनियां चरणांवरी ।
मस्तक नमू उभी ठेली ॥३॥
कृष्ण बोलिले प्रसन्नोत्तर ।
कुब्जे तुझा केला अंगिकार ।
निळा म्हणे तदाकार ।
वृत्ति झाली कुब्जेची ॥४॥