कंसराया पूजितें नित्य – संत निळोबाराय अभंग – १५५
कंसराया पूजितें नित्य ।
परि तो असुरचि उन्मत ।
काय पुरवील मनींचा हेत ।
दासी किंकर मी त्याची ॥१॥
परमात्मा हा सर्वेश्रवर ।
कृष्ण सुंदरा अतिसुंदर ।
चर्चनमिसें लावीन कर ।
अति मनोहर करीन पूजा ॥२॥
मग येऊनियां ते निकट जवळी ।
मस्तक ठेवी चरणकमळीं ।
म्हणे चर्चीन हा करतळीं ।
जरी तूं आज्ञा देशील ॥३॥
नित्य रायातें चर्चितां ।
चातुर्य आलें माझिया हातां ।
आतांही तेथेंहि जात जातां ।
तूंतें देखिले निज दृष्टी ॥४॥
मग तैसीची मी येथें आलें ।
तुझिया चरणातें पावलें ।
दासी विद्रूपचि परी मज ठेविलें ।
रायें याचि कार्यावरी ॥५॥
जणोनी तिचा अंतर्भावो ।
प्रसन्न झाले देवाधिदेवो ।
म्हणती तरी तूं अवश्यमेवो ।
चचीं चंदन निज हस्तें ॥६॥
निळा म्हणे आली पूजा ।
नाहींचि त्यागणे गरुडध्वजा ।
जैसिया तैसे मग हा वोजा ।
करी देणें यथोचित्त ॥७॥