मोडियेला धनुर्याग ।
हाहाकार झाला मग ।
आला आला रे श्रीरंग ।
बंधू बिळिरामा समवेत ॥१॥
आले ग्रामव्दारापाशीं ।
धांविले सकळहि नगरवासी ।
कृष्णरामाच्या सौंदर्यासी ।
पहावया उतावेळ ॥२॥
उभयतांचेहि स्वरुप अति नागर ।
ऐकिलें होतें वारंवार ।
आणि बळियेहि महावीर ।
तेज प्रतापी आगळे ॥३॥
सदा निर्भय मानसीं ।
आले चौबारा हाटवटिसी ।
जेवीं कां सिंह गजशाळेसी ।
शिरतां शंका न धरिती ॥४॥
उभे रंगशिळेवरी ।
अवलोकिता नरनारी ।
चढोनी माडिया गोपुरीं ।
गवाक्षव्दारीं पैं एकी ॥५॥
एके चढली भिंतीवरी ।
एक सन्मुखची शेजारीं ।
कृष्णदर्शनी आवडी भारी ।
नर बाळा नारी सारिखीचि ॥६॥
निळा म्हणे हत्कमळवासी ।
पूर्णब्रम्ह तेजोराशी ।
सगुणरुपिया हशिकेषी ।
कोण मा तयासी नावलोकीं ॥७॥