येतां देखोनियां बळिरामें ।
आकळिला तो अति विक्रमें ।
म्हणे पापिया तुवां अधर्म ।
बहुत केली कृष्णनिंदा ॥१॥
तया दोषाचें प्रयश्रिचत ।
आजी घे पा यथोचित ।
होई देहापासूनि मुक्त ।
म्हणोनि टांगेसी धरियेला ॥२॥
तेणेंहि उदंड वेचिली शक्ती ।
परि तयापुढें न चालेचि युक्ती ।
मग बोभाइला अदृष्टाप्रति ।
म्हणे नाडलों रे अभिमानें ॥३॥
बळिया बलिष्ट शिरोमणी ।
बळिराम आणि चक्रपाणी ।
नेणतां महिमा वेंचिली वाणी ।
पावलों फळ तें साध्यांचि ॥४॥
ऐसें बोलोनियां निश्रचळ ।
अवलोकिलें स्वरुप सकळ ।
झांकूनियां मग नेत्रकमळ ।
ध्यान हदय दृढाविलें ॥५॥
तंव बळरामें वेग केला ।
अंगाभोंवता ओवाळिला ।
आणि तेथेंचि पहा हो सोबकिला ।
प्रचंड खडकीं निघातें ॥६॥
निळा म्हणे दिधली मुक्ती ।
उत्तम कैवल्याही परती ।
कृपावंत हा श्रीपती ।
भक्तां वैरिया सारिखाचि ॥७