करितांचि सीमा उल्लंगन – संत निळोबाराय अभंग – १४८

करितांचि सीमा उल्लंगन – संत निळोबाराय अभंग – १४८


करितांचि सीमा उल्लंगन ।
म्हणती अक्रूरा ऐकें वचन ।
तुवां जावें रथ घेऊन ।
सांगावें वर्तमान रायासी ॥१॥
तेणें आज्ञा वंदुनी शिरीं ।
चालिला पुढें वेगें करी ।
बळराम कृष्ण गोवळ भारी ।
आले बळिया रजकापें ॥२॥
तंव तो वस्त्रें वाळवीत ।
उभा असे बळप्रमत्त ।
गोवळांते असे पुसंत ।
तुम्ही आलेती कोठुनी ॥३॥
ते म्हणती गोकुळवासी ।
जातों रायाचे भेटीसी ।
आदरें बोलाविलें कृष्णासी ।
आणि बळीराम सुजाणा ॥४॥
येरु म्हणे कोणता कृष्ण ।
गोवळ तुम्ही अवघे जण ।
आंलेती घोंगडी पांघरोन ।
जाल कैसेन रायापुढें ॥५॥
तंव कृष्ण बळिराम म्हणे त्यासी ।
आम्हां देंई उत्तम वस्त्रांसी ।
भेटोनी आलीया रायासी ।
देऊं उचित आणी तुझी वस्त्रें ॥६॥
तंव तो म्हणे भाग्यासी याल ।
बोलतांचि ऐसें ताडण पावाल ।
राजवस्त्रें हीं तुम्ही ल्याल ।
तैंचि वेंचाल जीवें प्राणें ॥७॥
बळिरामें हें ऐकतांचि कानीं ।
म्हणे वस्त्रें आणा रे लुटुनी ।
शंका मात्र न धरितां मनीं ।
हरा आवडती ज्या जैसीं ॥८॥
निळा म्हणे धांवले सकळ ।
बळिये अतुर्बळी गोवळ ।
तेथें झाला हालकल्होळ ।
रजक बळिया धांविन्नला ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

करितांचि सीमा उल्लंगन – संत निळोबाराय अभंग – १४८