नका होऊं खेदक्षीण – संत निळोबाराय अभंग – १४५
नका होऊं खेदक्षीण ।
घ्या भाष माझें बंधन ।
तुम्हां वांचूनियां मजही कोण ।
आहे तें आप्त इहलोकीं ॥१॥
जैसा तुमचा मजवरी भाव ।
माझीही तैसाची तुम्हांवरी जीव ।
नाही येथें संदेहा ॥ ठाव ।
चित्ताचित्त साक्ष असे ॥२॥
तुम्ही निरंतर मातेंचि ध्यातां ।
मीही न विसंबे तुम्हींची देखतां ।
ऐसें परस्परें बोलतां ।
लोटती उभयतां नेत्री पूर ॥३॥
वियोग न साहवें कृष्णासी ।
त्याही होती कासावीसी ।
परी धैर्याचिया अती आवेशीं ।
पुढील साधिती कार्यार्थू ॥४॥
भक्तकृपाळू श्रीहरी ।
अवघा प्रेमा भक्तांचि वरी ।
त्याचि कार्या अवतार धरी ।
न विसंबे क्षणभरी नव्हे परता ॥५॥
अनावरा आवरिलें जिहीं ।
जिव प्राण ठेवूनि पांई ।
हाही तयातें निज ह्रदयीं ।
सर्वकाळ आठवितु ॥६॥
निळा म्हणे संबोखिल्या ।
ऐसिया उत्तरीं स्थिराविल्या ।
मनोरथ करुनियां ठेविल्या ।
आपुलीये चिंतनीं सादर ॥७॥