मग सांगें गुह्य गोष्टी ।
मामा पाचारितो भेटी ।
इतुकेंचि ऐकोनियां पोटीं ।
कृष्णा आनंद न समाय ॥१॥
मग म्हणे बळिरामासी ।
जाऊं मामाचिये भेटीसी कृप करुनियां अक्रूरासी ।
मूळ आम्हांसी पाठविला ॥२॥
म्हणती बळिरामही चलावें ।
वोरसें मामासी भेटोनी यावें ।
आपणंसिही जिवें भावें ।
आर्त तयाचें अखंड ॥३॥
घेऊनि पांचशें गोवळ ।
समागमें आपुलें दळ ।
निघते झाले उतावेळ ।
आले घरासी पुसावया ॥४॥
मग नंदयशोदेप्रती ।
उभयतांहि नमस्कार करिती ।
मामासी भेटी जाऊं म्हणती ।
दयावी आज्ञा आशिर्वादें ॥५॥
तें म्हणती कंस व्देषी ।
महादृष्ट पापराशी ।
देखतांचि घेरतील रे दोघासीं ।
सर्वथा तेथें न जावें ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि हरि ।
म्हणे न चिंतावें हें अंतरीं ।
आम्हांसी आप्त या संसारीं ।
कोण मामाहुनी जिवलग ॥७॥