जांताचि गोकुळा बाहेरी ।
कृष्णपाउलांचिया हारी ।
उमटल्या देखोनि महीवरी ।
प्रेमा अंतरीं न संटे ॥१॥
चरणमुद्रांकित चिन्हें ।
देखोनि घाली लोटांगणें ।
अंतर्निष्ठेंचें हें लेणें ।
लेउनी निमग्न ते ठायी ॥२॥
आनंदाश्रु गळती नेत्रीं ।
स्वेदरोमांच उठती गात्रीं ।
कंप स्फुंदनें विकळ गात्रीं ।
सद्रदितु मुरकुंडें ॥३॥
सर्व साक्षी नारायण ।
जाणेनियां त्याचें चिन्ह ।
आला अति त्वरें धांवोन ।
तया उमजवून आलिंगी ॥४॥
दोघां हो सरली भेटी ।
पडिली आनंदाची मिठी ।
मग अचळ पुसोनियां मुखवटीं ।
परम कृपेनें न्याहाळी ॥५॥
पुसे अंतरीचें गुज ।
तयापाशीं अधोक्षज ।
येरें वंदूनियां चरणरज ।
मंजुळा उत्तरीं बोलतु ॥६॥
निळा म्हणे स्तवन करी ।
मग नि:स्तब्ध्ा निमिषवरी ।
अवलोकुनियां चरणावरीं ।
ठेवीं मस्त्क क्षणाक्षणा ॥७॥