राजा म्हणे रजकहि – संत निळोबाराय अभंग – १३७
राजा म्हणे रजकहि गाठी ।
आहेत पांचशे आणिक जेठी ।
मातंगकुळवई ही उग्रदृष्टी ।
सोडितां वरी झगटेल ॥१॥
परी तो येथें येईल कैसा ।
आलिया कदाचित करील वळसा ।
ऐसें विचारी जंव मानसा ।
तंव प्रधानहि पातले ॥२॥
राजा तयातें विचारी आणवितां कैसे येथें हरी ।
तंव ते म्हणती युक्ती माझारीं ।
हेंचि उत्तम दिसतसे ॥३॥
येथें आपुले सैन्यक ।
अपार काळाहुनी अधिक् ।
कृष्ण्ा येईल एकला एक ।
चारी अर्भकें घेउनी ॥४॥
तयां मागें कैची सेना ।
गोवळ गाईचा राखणा ।
करिती घरींचि चार नाना ।
येथें काय बळ त्यांचें ॥५॥
येतांचि आपुले शिवेआंत ।
शस्त्रपाणी करिती घात ।
ऐसाचि साधावा कार्यार्थ ।
विचार हाचि मानिला ॥६॥
निळा म्हणे आणिती काळ ।
घरां प्रार्थूनियां ते सकळ ।
ओढवलिया निदान वेळ ।
अघटितचि सहज घडे ॥७॥