जरी तो येईल येथें – संत निळोबाराय अभंग – १३६
जरी तो येईल येथें हरी ।
तरी मी सहसा विलंब न करीं ।
धोपटूनिया शिळेवरी ।
तेच क्षणी टाकीन ॥१॥
काळासम तुल्य माझें बळ ।
काय तें करील कृष्ण गोवळ ।
लागों नेदितां एकही पळ ।
निमिषाधेंचि उपटीन ॥२॥
गोकुळाचिये वाटेवरी ।
धुणें माझें निंरतरी ।
परि आलाचि पाहिजे वैरी ।
तुझा आणि माझाही ॥३॥
मागें पाठविले असुर ।
मायावी ते निशाचर ।
ते काय बापुडे किंकर ।
माझिये बळ शक्तीपुढें ॥४॥
राया येथें एक वेळां ।
आणवीं पां तया गोवळा ।
मग तूं कौतुक पाहें डोळां ।
मृत्युपंथे लावीन ॥५॥
आम्ही तुझे अंगलग ।
सेवक आणि बळिये चांग ।
रोखूनियां असों मार्ग ।
माझे धुणें त्याचि पंथे ॥६॥
निळा म्हणे ऐशा वचनीं ।
राजा संतोषविला मनीं ।
मग तो उचितातें घेउनीं ।
आला आपुलिया मंदिरां ॥७॥