बोलणें त्याचें तें नि:शब्द – संत निळोबाराय अभंग – १३५२
बोलणें त्याचें तें नि:शब्द ।
देखणें देखती सच्चिदानंद ।
करणें चाळितां आत्मबोध ।
विषयीं विषय बहमरुप ॥१॥
जाणें येणें आणिकां दिसें ।
अचळपणें तें जैसें तैसें ।
कल्लोळ सागरीं उससे ।
रश्मि जैसे निजबिंबीं ॥२॥
न मोडे त्या अखंडता ।
घेतां देतां सर्वही करितां ।
हांसतां खेळतां बोलतां ।
निजीं निजतां यथासुखें ॥३॥
लेणीं अळंकारहि मिरविती ।
जयापरि तैसेचि दिसती ।
न मोडतां स्वरुपस्थिति ।
चित्तीं चितंन सर्वदा ॥४॥
निळा म्हणे गुणातीत ।
देहीं देहातें नातळत ।
होऊनियां ठेले संत ।
अंखटित अखंडीं ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.