लोक सकळहि बाहेरी – संत निळोबाराय अभंग – १३२
लोक सकळहि बाहेरी येती ।
तंव निर्मळ गगन शुध्द गभस्ती ।
नवा चारा धेनुवा चरती ।
आणि दुभती यथेष्ट ॥१॥
तंव गडी अवघे मस्तकावरी ।
धरुनियां होते गिरी ।
गर्वारुढ ते अंतरीं ।
आम्ही पर्वत उचलिला ॥२॥
कृष्ण येथें टाळाटाळी ।
करुनियां म्हणावी आपणा बळी ।
ओझीं आमुचिया निढळीं ।
आपण मोकळा फुल झळका ॥३॥
कृष्णें जाणोनी मनोगत ।
म्हणे रे गडीहो काढा हात ।
येरु म्हणती तूंचि त्वरित ।
जांई येथूनी वेगळा ॥४॥
ओझें आमुचीया निढळीं ।
उगीचि टेकिली तुवं आंगोळी ।
यश घेऊनियां वनमाळी ।
वाउगाचि मिरविसी आम्हांत ॥५॥
मग त्यातें म्हणे श्रीहरी ।
मस्तक तुम्हीं काढा तरी ।
सोडुनी पाहतां नखाचि वरी ।
धरिला देखती सकळही ॥६॥
मग म्हणती उतरां आतां ।
एकल्या नुरवेचि तत्त्वतां ।
चौफेरी मस्तकीं धरितां ।
कृष्णें काढली आंगोळी ॥७॥
तंव ते दडपिली त्यांच्या भारें ।
मेलों मेलों म्हणती पोरें ।
कृष्ण म्हणे तुम्ही बळिये कीं रे ।
धरा उचलुनि निज शक्ती ॥८॥
निळा म्हणे पुरुषोत्तमा नेणवे म्हणती तुझा महिमा ।
धांव धांव रे मेघ:श्यामा ।
आम्हां वांचवी खचता हा ॥९॥