ते म्हणती रे हे सुरपतीची ।
पूजा आजी देवदेवाची ।
उच्छिष्ट करुं नये हे कुळींची ।
आली पध्दति चालत ॥१॥
ऐंसे एकोनियां गोवळ ।
धांविले जैसे कृतांतकाळ ।
कावडी हिरोनियां सकळ ।
आणिल्या त्या हरिपाशीं ॥२॥
तेणें जाहला हाहाकार ।
जहाले घाबरे नारीनर ।
म्हणे केला केला विक्षेप थोर ।
पूजेमाजी इंद्राचिने ॥३॥
अविवेकी हे धांवोनी आले ।
बळेंचि इंद्रभाग हिरोनी नेले ।
यावरी आतां नव्हे भलें ।
क्षोभलिया सुरपति ॥४॥
कृष्णें उघडूनियां कावडी ।
गोवळ बैसविले परवडी ।
म्हणे रे गडिहो सेवा गोडी ।
अवघियाचीच निवाडे ॥५॥
आजी आम्हींच इंद्र जाहलों ।
पूजा घेऊनियां तोषलों ।
बरे उत्तम धणी धालों ।
तृप्तीवरी स्वीकारा ॥६॥
निळा म्हणे कृष्णचंद्रु ।
आदि इंद्राचाही इंद्रु ।
यावरी कृपेचा समुद्रु ।
करील कौतुक आसमाई ॥७॥