भाव भक्तीचा भुकेला ।
दास दासांचा अंकिला ।
न वजे दुरी उभा ठेला ।
अवघा झाला त्यांचाचि ॥१॥
भक्तवचनें ऐके कानीं ।
भक्त आवडी पाहे नयनीं ।
भक्त ह्रदयीं आलिंगुनी ।
निज ऐश्वर्य अर्पी त्यां ॥२॥
भक्त मानी जीवप्राण ।
त्यांसी न त्यां विसंबे एकही क्षण ।
त्यांचें वागवी हा भूषण ।
निंबलोण उतरी त्यां ॥३॥
जीव भाव देवावरी ।
जिहीं ठेविला निजनिर्धारीं ।
देवावीण दुसरी परी ।
तुच्छ मानिलें संसारा ॥४॥
न लगे वैकुंठ त्यांचिये चित्तीं ।
कैवल्यातें परतें करिती ।
देवावीण ते नेघों म्हणती ।
मोक्ष मुक्ती फुकटा ॥५॥
देवाविण रिध्दीसिध्दी ।
ओंवाळुनी सांडिती त्या उपाधी ।
देवा वेगळी त्यांचिये बुध्दी ।
नाहींचि विश्रांति आणिक ॥६॥
निळा म्हणे त्यांचिये घरीं ।
राहे होउनी अंकित हरि ।
भक्त काज हा कैवारी ।
ब्रीदें वागवी सर्वदां ॥७॥