भक्त स्तवनें जें जें करिती – संत निळोबाराय अभंग – १२३७

भक्त स्तवनें जें जें करिती – संत निळोबाराय अभंग – १२३७


भक्त स्तवनें जें जें करिती ।
तें जें ऐकोनियां श्रीपती ।
सुखें संतोषोनियां चित्तीं ।
दासा देती वरदानें ॥१॥
ध्रुवानें वनीं आराधिला ।
तैसाचि उपमन्यें स्तविला ।
एक तो अढळपदीं स्थपिला ।
एका दिधला क्षीरसिंधु ॥२॥
प्रल्हादाचें स्तवन गोड ।
त्याचें पुरवी अवघेंचि कोड ।
अग्निविषाचें सांकड ।
नेदी पडों शस्त्राचें ॥३॥
द्रौपदीनें स्तवितांचि तातडीं ।
नेसतीं झाला तिचीं लुगडीं ।
कौरवें लाजविलीं बापुडीं ।
अंगुष्ट तोही दिसों नेदी ॥४॥
गजेंद्राचिया स्तवनासाठीं ।
धांवे वैकुंठीहुनी उठाउठी ।
निजकरें घालूनियां मिठी ।
सोडवी संकटी स्वामी माझा ॥५॥
रुक्मिणीचें प्राणिग्रहण ।
करी ऐकोनियां तिचें स्तवन ।
पांचाळिये हातींचें भाजीपान ।
करी भोजन स्तवनें तिच्या ॥६॥
निळा म्हणे कृपामूर्ति ।
अपार भक्तांचिये स्तुती ।
ऐकोनियां तोषलेती ।
मी ही बाळमती विनवितों ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्त स्तवनें जें जें करिती – संत निळोबाराय अभंग – १२३७