बहुता देऊनी अभयदानें – संत निळोबाराय अभंग – १२३१
बहुता देऊनी अभयदानें ।
गौरविलें आपल्या मनें ।
घालूनी शांतीचीं आसनें ।
ब्रम्हसाम्राज्यीं बैसविलें ॥१॥
ध्यानतन्मयाचीं छत्रें ।
माथां झळकतीं विचित्रें ।
अगाध कीर्तीचीं दिव्य वस्त्रें ।
प्रल्हादादिकां समर्पिलीं ॥२॥
नारदा निर्लोभ वागेश्वरी ।
नामस्मरणाची वैखरी ।
देउनी दिव्य अळंकारीं ।
दैवांदैत्यांमाजीं मिरविला ॥३॥
व्यासा वाल्मिका अगाध मती ।
देउनी वंदय केलें त्रिजगतीं ।
जनक पृथु हे भूपती ।
आपुले पंगती बैसविले ॥४॥
अर्जुनादिकांसी आपुलें ।
ऐश्वर्य देउनी थोराविलें ।
सांख्य सिध्दांत उपदेशिले ।
रणीं वागविले रथवारु ॥५॥
उध्दवा मैत्रेया कृपा वोगरिली ।
निजात्मज्ञानें तृप्ति केली ।
भक्त कृपाळु माउली ।
गौरविलीं निज बाळकें ॥६॥
निळा नेणतें निपटणें ।
कांहीचि खाऊं जेऊं नेणें ।
वाढविलें ते स्तनपानें ।
नामचिंतनें आपुलिया ॥७॥