तंव ते म्हणती नहो बाहेरी
आम्ही बळकट चढावाया वरी
वृक्षही उंच गगनोदरीं
डोहो भ्यासुर अक्षोभ हा ॥२॥
म्हणे गडीहो तरी तळींचि रहा
आणितों जाऊनि चेंडु पहा
ते म्हणती रे अचपळा रहा
निमित्य आम्हावरी आणूं नको ॥३॥
एका दोन कामीं वांचलासी
तैसेचि येथेंही पाहतोसी
परी हे बुध्दि नव्हे ऐसी वेळा सारखिया नसताती ॥४॥
पाय निसरोनियां जाईल
अथवा खांची उपटी उपटे
हांसे इतरांचे होईल
आपणही जिवें घातावें ॥५॥
ऐसें न करिती शहाणे
विचारुनी पहाती सर्वगुणें
मग हितावह तोचि घरणें
दृढ निश्रचयें मानसीं ॥६॥
निळा म्हणे सांगतां ऐसें
न मानिजे कृष्ण मानसें
मनींचें कार्य जें अनारिसें
तें नेदीचि कळों कोणासी ॥७॥