अवघ्या कळा याचे हातीं ।
न करी काय एक श्रीपती ।
विष पाजितां अमृतीं ।
केली तृप्ती प्रल्हादा ॥१॥
चंद्रहास्याचा कैवारी ।
रक्षिलें त्या महामारी ।
राज्य देऊनियां मुरारी ।
वैष्णवांमाजी श्रेष्ठ केला ॥२॥
अर्जुनाची प्रतिज्ञा गहनु ।
देखोनि दिवसा लोपिला भानु ।
जयद्रथासि यमसदनु ।
प्राप्त केला तात्काळीं ॥३॥
गर्भी रक्षिला परीक्षिती ।
सुदर्शन चक्र घेउनि हातीं ।
उदरी प्रवेशोनियां श्रीपती ।
छेदिलीं शक्ति अनिवार ॥४॥
द्रौपदीच्या वस्त्रहरणीं ।
उडी घालूनियां ततक्षणीं ।
केली वस्त्राची पुरवणी ।
लाजविलीं कौरवें ॥५॥
गजेंद्रें संकटीं धांवा केला ।
वैकुंठीं यातें तो जाणों आला येऊनि तांतडी मग सोडविला ।
विमानीं नेला बैसवूनी ॥६॥
निळा म्हणे ऐसीं किती ।
तारिलीं ताराल तुम्ही पुढती ।
जयां तुमच्या नामीं प्रीति ।
ते ते होती आप्त तुम्हां ॥७॥