माते बळिया शिरोमणी
कृष्ण नाटक हा विंदानी
आम्हां जळतजळतां वनीं
येणें रक्षिले निमिषाधें ॥१॥
आम्हां जाळित आला ओणवा
विराटरुपी हा झाला तेव्हां
मुखचि पसरुनीयां अघवा
प्राशन केला दावानळ ॥२॥
आम्हीं देखिलें तें नयनीं
दिव्य रुप याचें अवघ्या जणीं
ऐसें ऐकोनियां ते जननी
परम आश्रचर्यातें पावलीं ॥३॥
घरोघरीं हेचि वार्ता
विस्तारली गोवळ सांगतां
एक म्हणती हो श्रीअनंता छ न म्हणावें मानव यावरी ॥४॥
जे जे याचे अचाट खेळ
देखिले ऐकिले तुम्हीं ते सकळ
कृष्ण हा परमात्मा केवळ
आम्हीं मानुं आपुलाचि ॥५॥
सकळांतरी याचा वास
वसविले ते येणेंचि देश
याविण रिताचि अवकाश
न दिसे कोठेंही धुडितां ॥६॥
निळा म्हणे प्रतीत ऐशी
बाणली गोवळां आदि सकळांसी
मग ते तयातेंचि मानसी
ध्याती पूजिती सर्वदा ॥७॥
माते बळिया शिरोमणी – संत निळोबाराय अभंग – ११८