भक्तिं भावचि बांधिला गांठी।
आला उठाउठीं देव तेथें ॥१॥
म्हणे मज घ्या सोडायसी ।
ते म्हणती ठकिसी नेघों तुज ॥२॥
लटिकीच माया धरिशील रुपें ।
लपशील खोपें रिघोनियां ॥३॥
न सोडूं भाव जांई तूं आतां ।
विनवी देवभक्तां काकुळती ॥४॥
भावही घ्यारे भक्तिही घ्या रे ।
मजही घ्यारे तुमचाचि मी ॥५॥
निळा म्हणे साधिलें काज ।
भक्तिं आपुली पैज जिंकियेली ॥६॥